Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

या विभागात

  • कृषी महाविद्यालय प्राध्यापक
  • शेतकरी

कृषी महाविद्यालय प्राध्यापक

१.कृषी क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय तुम्ही का आणि कसा घेतला ?
उत्तर : ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापक मंडळी, त्यांना आलेले अनुभव आणि त्यांना असलेले ज्ञान, भविष्यकालीन संधी त्याप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत असतात. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण घेत असताना एक शिक्षक म्हणाले, की मुलानों एम.एस्सी.,अभियांत्रिकी आणि मेडिकलला जातात. शिक्षकांच्या अनुभवावरून त्यांनी सांगितले कृषी क्षेत्रात गुणवंत,विद्वान मुलांचा जास्तीत जास्त ओढा जर तिकडे गेला, तर आपल्याला कृषी क्षेत्रात चांगले संशोधन, संधी आहे. ते क्षेत्र चांगल्या मुलांच्या दृष्टीने थोड वंचित क्षेत्र आहे. इथे जर आपण गेलो तर एक संधी, व्यवसाय, नोकरी आहे. कृषी क्षेत्राकडे गुणवंतांचा ओढा नाही, असे त्यांनी आम्हाला १९८२ साली सांगितले. आमची पार्श्वभूमी शेतकी असल्यामुळे ते क्षेत्र आम्हाला निश्चितच भावलं. आम्हाला शिक्षकांचा हा प्रस्ताव मध्यबिंदू वाटला. रु.१८०/- ते रु. १९०/- पुणे कृषी महाविद्यालयाचे शुल्क होते. विचार करण्याची गोष्ट आहे की अत्यल्प शुल्क आणि सवलत नसती, तर आम्ही कृषी महाविद्यालयाकडे देखील आलो नसतो. आज मला या क्षेत्राविषयी अभिमान वाटतो.
६० टक्केपेक्षा जास्त जनता ग्रामीण भागात राहते. जगासोबतच आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा ‘कणा’ हा शेती आहे. शेतीशी निगडीत सर्व क्षेत्र आहेत. शेतकऱ्याला देखील असे वाटते की आपला मुलगा शेती सोडून अन्य क्षेत्रात जावा. परिणामी परिस्थिती अशी येणार आहे, की उत्पादनाच्या तुटवड्याची भिती वाढणार आहे, म्हणून शेतीला पर्याय नाही.चांगल्या तंत्रज्ञानाची, तज्ज्ञांची, कामगारवर्गाची आणि त्यासोबत आवश्यक शेती ज्ञानाची सांगड आपल्याला कायमस्वरूपी घालून ठेवावी लागणार आहे. समाजासाठी आणि शेतीसाठी काम करण्याची संधी मला मिळाल्याचा आनंद वाटतो. शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे शेतीविषयी आत्मीयता, भावना आणि प्रेम आहे आणि काम अधिक प्रभावीपणे करण्याची प्रेरणा मिळते. 

२. पुण्यातील कृषी महाविद्यालयाविषयी थोडक्यात माहिती सांगा.
उत्तर : शहराच्या जवळची शेती असल्यामुळे येथे प्रगत शेतीला आणि तंत्रज्ञानाला जास्त वाव आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हा सर्व अर्थाने प्रभावी आणि पुरोगामी आहे. कृषी शिक्षणाची गरज ओळखून ब्रिटीशांनी ५ कृषी विद्यापीठे स्थापन केली. १९०७ साली पुण्यात पहिले कृषी विद्यापीठ ब्रिटीशांनी स्थापन केले. याच कृषी विद्यापीठातून देशाला आणि महाराष्ट्राला एक अग्रस्थानी मार्गदर्शन म्हणून भूमिका बजावावी लागते. महात्मा फुले विद्यापीठ आणि राहुरी कृषी विद्यापीठ हे पुणे विद्यापीठाला जोडले गेले आहे. पुणे कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे कृषी क्षेत्रात विविध स्तरावर चांगल्या प्रकारे कार्य करून नामवंत झाले आहेत. 

३. पुण्यातील महत्त्वाची आणि शेतकऱ्यांच्या आवडीची पिके कोणती ?
उत्तर : हवामान, जमिन, पर्जन्यमान आणि पाण्याची उपलब्धता यानुसार पिक पद्धतीची विभागणी झालेली आहे. पुण्याच्या सभोवताली फळबाग मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहरालगत भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहे. हवेली,खेड,मनस,राजगुरुनगर,मुळशी,मावळ या तालुक्यांसोबतच खंडाळा, सातारा, इंदापूर, बारामती या पट्ट्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला करतात. शहराची भूक भागवण्याच्या दृष्टीकोनातून भाजीपाल्याला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. 

फळांमध्ये द्राक्ष, अंजीर, सिताफळ, चिकू यांची लागवड केली जाते. कांदा पिकाला मोठ्या प्रमाणावर महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. पैसा देणाऱ्या पिकाकडे येथे जास्त काळ दिसून येतो. साखर कारखाने असल्यामुळे ऊस हे एक महत्वाचे पिक मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञाने शेतकरी ऊसाचे उत्पादन घेत आहे. फळ बाग, पालेभाज्या आणि पैशाची पिके हे पुणे जिल्ह्याचे अंग बनले आहेत. 

४. शेती व्यवसायाला पूरक असे पुण्यात कोणकोणते व्ययसाय आहेत ?
उत्तर : संलग्न कृषी व्यवसायात कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुल आणि हरित गृहातील भाजीपाला असे शेती पूरक व्यवसाय आहेत. पुण्यापुरते मर्यादित न राहता हे व्यवसाय मुंबई, राज्य आणि परदेशात उत्पादनाची निर्यात होते. पुण्याची शेती पुरोगामी असल्यामुळे तिचे जागतिक क्रमवारीत चांगले स्थान आहे. मत्स्य शेतीला पुण्यात चांगली मागणी आहे.
शेळीपालनासाठी शेतकऱ्यांना जगामधील घडामोडी आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त प्रजातीचा आणि हवामानाला अनुकूल अशा राहुरी, संगमनेरी, उस्मानाबादी इत्यादी अशा शेळीच्या प्रजातींचा कार्यक्रम विद्यापीठात नेहमी घेतला जातो.शेळी गरीबाची गाय असली तरी आज ही शेळी शेतकऱ्यांना आर्थिक नफा मिळवून देत आहे. बोकडाच्या मांसाला बाजारात मोठी मागणी आढळून येते. अशाप्रकारे अल्प भूधारक शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा व्यवसाय आहे. 

५. पुण्यातील बागायती शेतीचे महत्त्व सांगा.
उत्तर : पुण्यात बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. खडकवासला धरण, वरसगाव-पानशेत धरण, वीर धरण, भाटघर धरण, पवना नदी यांमुळे मोठ्या प्रमाणावर जलसिंचनाच्या सुविधा तयार झाल्या आहेत. विस्तृत बागायाती क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन वर्षभर होते. द्राक्ष, ऊस आणि केळी यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बागायती क्षेत्रासाठी पोषक वातावरण असल्यामुळे बागायती शेतीची पुण्यात भरभराट होत आहे.     

६. ऋतुमानानूसार आणि पर्जन्यवृष्टीच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत केली जाते  ? 
उत्तर : पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर पुण्यात देशपाताळीवरचा भारत मोसम हा  हवामान शास्त्राचा विभाग आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत कृषी हवामानशास्त्र हा विभाग आहे. भारत मोसम विभाग आणि कृषी हवामानशास्त्र विभाग यांद्वारे शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी विषयक आणि शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, याविषयी सल्ला दिला जातो. परिस्थितीनुसार पावसाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी – जास्त, प्रतिकूल परिस्थिती घ्यावयाची काळजी आपल्याकडे उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना अशा प्रकारे जागरूक ठेवून ते आपली शेती योग्य प्रकारे करत असतात. पर्जन्यमानानुसार (कमी-जास्त) पिक पद्धती बदलतात. कोरडवाहू शेतीत शेतीचे दोन हंगाम होतात. पर्यायी पिक पद्धती शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत सांगितली जाते. आकाशवाणी आणि दूरदर्शनद्वारे हवामान शास्त्र वेळच्यावेळी शेतकऱ्यांना माहिती मिळत असते. याबाबत शेतकरी जागरूक असतो.

७. शासनाच्या विविध योजना आणि स्वयं रोजगारातून व्यवसाय निर्मितीबाबत शेतकऱ्यांना काय सांगाल ?
उत्तर :  शेतीचे अविभाज्य अंग म्हणून पूरक व्यवसाय आणि स्वयं रोज्गाराकडे पहिले जाते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय तरुण नेतात. दुग्धव्यवसाय हा दैनंदिन तसेच ऊब देणारा व्यवसाय आहे. शेतीला जे धान्य, चारा, पिके यांपासून राहिलेला कडबा किंवा चारा हा डेरीला उपयुक्त ठरतो. डेरीमधून जे काही खत मिळते, ते शेतीला आवश्यक असते. एकमेकांना पूरक असल्यामुळे दुग्धव्यवसायातून रोजगार निर्मिती होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे परदेशी गाय आणि उत्तर भारतातील गाय, म्हशी यांचा व्यवसायासाठी वापर होतो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत ‘फुले त्रिवेणी गाय’ विकसित केली आहे. फुले त्रिवेणी गायीमार्फत शेतकऱ्यांना दुधाचं उत्पन्न वाढायला मदत होणार आहे. राहुरी कृषी विद्यापीठामार्फत आपण गोठीत वीर्य संकलन प्रयोगशाळा स्थापन केली आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी फुले त्रिवेणीचे वीर्य कृत्रिमरीत्या शेतकऱ्यांसाठी पुरविले जाते. महाराष्ट्र शासनाच्या पशु विज्ञान विभागतर्फे गोठीत वीर्य पुरविले जाते. यामुळे गायीच्या प्रत्येक पिढीमध्ये आणि दुधाच्या उत्पादनाच्या वेतामध्ये वाढ होत जाते. पशुधन अधिकारी पुणे विद्यालयामार्फत पुण्यातील विविध शेतकऱ्याकडे मागणीनुसार वीर्य पुरवठा करतात. त्याची इत्यंभूत माहिती (डेटा) महाविद्यालयाकडे आहे. २५०० लिटर दुध एका वेतामध्ये फुले त्रिवेणी गायीमार्फत शेतकऱ्यांना उपलब्ध होते.खाद्य व्यवस्थापन, शुद्ध दुध व्यवस्थापन, उच्च तंत्रज्ञान, जनावरांची शास्त्रीय पद्धतीने जोपासना शेतकऱ्यांना विद्यापीठामार्फत दिले जाते. तंत्रज्ञान प्रसारणाची विभागीय विस्तार यंत्रणा १० जिल्ह्यामध्ये विभागविद्यापीठाकडे उपलब्ध आहे. २००७ साली आंतरराष्ट्रीय प्रदर्शन पुणे कृषी विद्यापिठामध्ये भरविण्यात आले होते. मेळावे आणि प्रदर्शनांचा लाभ शेतकरी वेळोवेळी घेत असतात. शेतीवरील तंत्रज्ञानाचे लाखो शेतकऱ्यांनी लाभ घेतला. 

८. पिकांच्या मृदेला (माती) अनुकूल अशी कुठली पिके आवश्यक आहेत आणि त्याबाबत शेतकरी जागरूक आहे का ?
उत्तर : शेतीचे ज्ञान महत्त्वाचे आणि आवश्यक आहे, हे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना सांगावे लागते. शेतकरी फक्त हे पाहतो की बाजारात कोणत्य पिकाला मागणी आहे आणि तो त्याच प्रकारचे पिक घेतो. असे खूप वेळा घडतं. जमीन ज्या पिकाला योग्य नाही असे पिक शेतकरी घेतो,पिक वाढत नाही, त्याला व्यवस्थित पिक येत नाही, उत्पादन चांगले मिळत नाही आणि स्वतःचे नुकसान ओढवून घेतो. हे सर्व झाल्यानंतर शेतकरी कृषी विद्यापीठाकडे विचारणा घेतो. 
मृदेचे शेती शास्त्रामध्ये महत्त्व आहे. शासनामार्फत आणि विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना प्रथमत: त्याच्या जमिनीची चाचणी करण्यास आपण सांगतो. आपल्या जमिनीमध्ये किती मूलद्रव्ये किती प्रमाणात आहेत, तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांच प्रमाण किती आहे आणि जमिनीचा सामू कसा आहे. आम्लतेचे आणि विम्लतेचे या दोन्हींचे प्रमाण, रासायनिक क्रिया करायला आपण शेतकऱ्यांना सांगतो. १० ते १२ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शेवटच्या वर्षात चार महिन्यात आपण त्यांना ग्रामीण भागात पाठवतो. विद्यार्थी गावोगावी उपक्रमाविषयी प्रबोधन करतात. गावाच्या मातीचे संकलन करून त्याची चाचणी करतो. मातीचे परीक्षण रिपोर्ट शेतकऱ्यांना सांगतो. विद्यार्थ्यानमार्फत शेतकऱ्यांना कळते, की आपली जमीन कोणत्या पिकासाठी सक्षम आहे, मृदेत कोणते गुणधर्म आहे आणि नसल्यास त्याची पूर्तता कशी करायची. माती परीक्षणामुळे आपण शेतकऱ्याला सांगतो, की कोणते पिक घेणे आवश्यक आहे. अतिशय मोलाचा मार्गदर्शन आपण शेतकऱ्यांना करतो. याबाबत अजून कार्य होणे आवश्यक आहे. 

९. माहिती-तंत्रज्ञानाचा फायदा पुण्यातील शेतकऱ्यांना कसा होईल ? कोणते माध्यम ग्रामीण भागात प्रभावी ठरेल ?
उत्तर : बदलत्या काळानुरूप शेतकऱ्यांसाठी माहिती-तंत्रज्ञानाचे नवे दालन निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात दूरदर्शन, आकाशवाणी हे एक माध्यम झाले . दुसरे माध्यम वृत्तपत्र, नियतकालिक, साप्ताहिक, मासिक हे ग्रामीण भागात प्रसिद्धीमाध्यमे आहेत. कारण ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा मोठा वर्ग आहे. पुरोगामी, प्रगत आणि सुशिक्षित शेतकऱ्यांना अडचणी जास्त प्रमाणात आढळत नाही. ग्रामीण भागात शेतीसंबंधीच्या ग्रंथालयाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देणे शक्य नाही. अधिकाऱ्यांची संख्या मोठी असली तरी सर्व गावांपर्यंत पोहचणे अशक्य आहे. 
‘गावपातळीवर ग्रंथालय’ ही योजना प्रत्येक गावात राबवण्याची गरज आहे. आय.टी. च्या दृष्टीकोनातून ग्रंथालयात संगणक असावेत, इंटरनेट कनेक्टिव्हिटीमार्फत जागतिक स्थरावर पुण्यासोबातच सर्व शेतकऱ्यांना माहितीचे दालन उघडले जाईल. शेतकऱ्यांना आवश्यक अशा संकेतस्थळावर उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्याना उपलब्ध होईल. बिहाईव्हसारख्या वेबसाईटवर त्यांना आधुनिक आणि आवश्यक अशी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे शेतीच्या जमिनीचे जे विभाजन झाले आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत ‘सामुहिक शेती‘ केल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळतो.

१०. तरुणांनी शेतीकडे वळावे, यासाठी काय मार्गदशन कराल ?
उत्तर : तरुणयुवक शेतीकडे वळले, तर त्यांचे स्वागतच आहे. तरुणांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास त्यांना उच्च तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती, कमी वेळेत जास्त उत्पादन, अंतर्गत बाजापेठेत जास्त भाव असणारे उत्पादन आणि निर्यातीमध्ये त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे पुष्प शेती आणि भाजीपाल्याची शेतीसाठी फार मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तरुणांची खूप उदाहरणे आपल्याकडे आहे. पुण्याकडून कोल्हापूरला जाताना बोरगाव येथील वरणेगावात तरुणांनी पुढे येऊन फुलशेती आणि भाजीपाला शेतीने ‘पोलिहाउस’ तयार करून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत. उच्च तंत्रज्ञानाने कुक्कुटपालन, गोड्या पाण्याची मत्स्य शेती, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती आधुनिक पद्धतीने केली जात आहे.   

११. पुण्यासारख्या शहरात टोलेजंग इमारती आणि बांधकाम व्यावसयिक मोठ्या प्रमाणावर जमिनी विकत घेत आहेत अशा परिस्थतीत शेती टिकवायची असेल तर काय उपाययोजना कराव्या लागतील ? 
उत्तर : ही एक गंभीर समस्या ही पुण्यासारख्या शहरात मोठ्या प्रमाणावर आढळते. कारण अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत समस्या आहेत. सुपीक जमिनींना हात न लावता नापीक जमिनींचा व्यवसायिकदृष्ट्या वापर करावा. शहराच्या बाजूला शेती असल्यास लोकांना जवळच भाजीपाला आणि अन्नधान्य उपलब्ध होईल. शहरालगत शेती असल्यास शहरीकरणाच्या सौंदर्यात वाढ होईल आणि शहराचे संतुलन देखील राहिले जाईल.
सामाजिक संस्था पुढे येऊन त्यांचे कार्य  शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले पाहिजे. आधुनिकरित्या शेतीचा विकास होणे महत्त्वाचे असून ती काळाची गरज आहे.  

 

मुलाखत : डॉ. विठ्ठल साहेबराव शिर्के  

शब्दांकन : विनित शंकर मासावकर 

 

5
सरासरी 5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation